शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे Pudhari
धुळे

Panjara Kan Sugar Factory | पांझरा- कान साखर कारखान्यामुळे रोजगार वाढतील : मंत्री दादा भुसे

Dhule News | शेतकरी मेळावा आणि पांझरा- कान साखर कारखाना नूतनीकरण सोहळा

पुढारी वृत्तसेवा

Dhule Panjara Kan sugar factory

धुळे: साक्री तालुक्यासह परिसरासाठी महत्वपूर्ण असलेल्या पांझरा- कान सहकारी साखर कारखाना कार्यान्वित झाल्यावर कारखान्याच्या माध्यमातून रोजगाराच्या क्षमतेत वाढ होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज व्यक्त केला.

मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत आज पांझरा- कान सहकारी साखर कारखाना नूतनीकरण शुभारंभ कार्यक्रम आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, भाडणेचे सरपंच अजय सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुळशीराम गावित, बबनराव गायकवाड, साखर कारखाना समितीचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, साक्री तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. गेल्या महिन्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलासा दिला आहे. त्यासाठी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्य शासनाने निकषांपेक्षा जास्त दराने मदत केली असून भरपाईची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

आमदार श्रीमती गावित यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून बंद असलेला पांझरा- कान साखर कारखाना आता सुरू होत आहे. ही समाधानाची बाब आहे. कारखाना सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी गायकवाड, प्रा. नरेंद्र तोरवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. सरपंच सोनवणे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT