धुळे : धुळे शहरात साथरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेमार्फत ११ पथकांची नियुक्ती करून रुग्णांच्या घरी भेटी देण्यात येत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी पदभार पुन्हा हाती घेतल्यानंतर साक्री रोड परिसरातील विविध भागांची तुरळक न थांबता प्रत्यक्ष पाहणी केली.
यशवंतनगर, भिमनगर, कुमारनगर आणि साक्री रोड परिसरात अतिसार रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गृहभेटी, पाणी नमुना तपासणी, आरोग्य शिबिरे आणि रुग्ण तपासणी यांचा समावेश आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
या ११ पथकांमध्ये कनिष्ठ अभियंते, वैद्यकीय अधिकारी, रसायनतज्ञ यांचा समावेश असून, पुढील कार्यवाही खालीलप्रमाणे राबवली जात आहे:
रुग्णांच्या घरी भेट देऊन १५ दिवसांची दैनंदिन तपासणी
घरगुती व जारमधील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी
रुग्णांची प्रकृती सुधारते आहे की नाही, याची नियमित माहिती संकलन व अहवाल सादरीकरण
परिसरातील स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आदेश
आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी यशवंतनगर, भिमनगर, शनिनगर, कुमारनगर व हनुमानटेकडी परिसरात भेट देऊन नागरिकांच्या घरी पाणी नमुना तपासणी ऑन द स्पॉट केली. तपासणीअंती पाणी पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाहणीवेळी माजी नगरसेवक बन्सीलाल जाधव, मनपा कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, उपअभियंता चंद्रकांत उगले, आरोग्याधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, तसेच वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंते व रसायनतज्ञ उपस्थित होते.