धुळे : सध्याच्या आधुनिक डिजिटल युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक निर्माण करावे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी (दि.१६) केले. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ज्येष्ठांचे टोणगांवकर ग्रंथालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप आज संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदिश पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ.फुला बागुल, प्राध्यापक डॉ.रमेश माने, अहिराणी कथाकार प्रविण माळी, साहित्यिक सुरेश मोरे, प्रभाकर शेळके, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले की, आज जग इतक्या वेगाने बदलते की, एक गोष्ट आपल्याला समजण्याच्या अगोदर दुसरे काही नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. आज सोशल मीडिया, व्हॉट्सअप संपत नाही, तोवर ए.आय हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम वाचन संस्कृतीवर होत आहे. आजच्या युवा पिढीचे वाचन कमी झाले असून ही वाचन संस्कृती वाढविण्याची गरज आहे. साहित्यिकांची संख्या हळूहळू कमी होत असल्यामुळे वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक निर्माण करणे गरजेचे आहे, असेही पालकमंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले. यानंतर रावल यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.