धुळे: धुळे-सोलापूर महामार्गावरील चांदे फाटा येथे मोठी कारवाई करत धुळे तालुका पोलिसांनी बनावट चलनी नोटांची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या या तरुणाकडून २२ हजार २०० रुपये किमतीचे बनावट चलन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बनावट नोटांच्या जाळ्याचा शोध घेण्यास मदत होणार आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ (जुना) वरील चांदे फाटा परिसरात एक तरुण बनावटी नोटा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार केले.
या पथकाने चांदे फाट्याजवळील सुर्यपुत्र हॉटेल परिसरात सापळा रचून संशयित तरुणावर छापा टाकला. ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी केली असता त्याचे नाव मोहम्मद जफर मोहम्मद कुद्दुस (रा. टिपु सुलतान चौक, इकबाल नगर, बुलढाणा) असल्याचे उघड झाले. त्याच्या अंगझडतीमध्ये ५०० रुपयांच्या ४४ बनावट नोटा आणि १०० रुपयांच्या २ बनावट नोटा असा एकूण २२,२०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली असून, त्याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितले की, या बनावट चलनाची तस्करी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा आता कसून शोध घेतला जाणार आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी इशारा दिला आहे की, प्राथमिक चौकशीनंतर बनावट चलनी नोटांचा व्यवसाय करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही.