धुळे: राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण २५ हजार ५८५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच ४२ कोटी ३५ लाख ६१ हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करुन देण्यात आली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा माधुरी आनंद यांच्या परिपत्रकान्वये धुळे जिल्हयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली.
न्यायालयातील प्रलंबित ६४९९ प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे दाखलपुर्व ७४ हजार १४६ प्रकरणे ज्यामध्ये महानगरपालिका, ग्रामपंचायत, विज थकबाकी प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीचे थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती. सदर प्रकरणांपैकी ४३२ प्रलंबित प्रकरणे व २५ हजार १५३ दाखलपुर्व प्रकरणे असे एकुण २५ हजार ५८५ सामोपचाराने निकाली निघाली. सदर लोकअदालतमध्ये ४२ कोटी ३५ लाख ६१ हजार रूपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली.
धुळे जिल्हात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कौटुंबिक वादातील प्रकरणामध्ये ३ जोडपे पुन्हा एकत्र नांदण्यास गेले. तसेच मोटार अपघात प्रकरणापैकी १२४ प्रकरणे तडजोडीने निकाली होवुन रक्कम रू.१० कोटी ७९ लाख २८ हजार रूपये पक्षकारांना वसुल करून देण्यात आली. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, पक्षकार, इत्यादींनी अमुल्य सहकार्य केले त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, प्रविण एन. कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.