Mukhyamantri Teerth Darshan Yojana
धुळे : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतंर्गत विशेष रेल्वे जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने 'जय श्री राम' च्या गजरात रवाना झाली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात केली.
धुळे रेल्वे स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमांस खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जिप समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, आयआरसीटीसीचे नवीन कुमार सिन्हा, इंडियन रेल्वे कॅटरींग ॲण्ड टुरीझम कॉर्पोरेशन, मुंबई प्रतिनिधी श्रीमती मृण्ययी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदिप कर्पे, गजेंद्र अंपळकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, यात्रेकरु, त्यांचे नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री रावल यांनी यात्रेनिमित्तच्या शुभेच्छा देताना सांगितले, राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा असते. परंतू गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील 161 आणि भारतातील 88 तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" राज्य शासनाने सुरु केली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही केवळ एक योजना नाही, तर वृद्धांचा सन्मान असून निवडणूकीवेळी जे बोललो ते करुन दाखविल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पहलगाम येथे अतिरेकी हल्लयात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.