धुळे : गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभाग हा भ्रष्ट विभाग म्हणून पुढे येत आहे. या विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडो रुपये सापडणे ही दुर्दैवी बाब आहे. आता लोकांमधूनच क्रांती झाली पाहिजे. शिक्षण हा विकासाचा केंद्रबिंदू असावा. विकासाचे काम असणारा रस्त्याचे काम प्रलंबित राहिल्यास काही फरक पडत नाही. हे काम आज नाहीतर उद्या होऊ शकते. पण आजच्या पिढीचा विकास पुढे ढकलला. तर देशाचे मोठे नुकसान होऊ शकते, असे मत आमदार सत्यजित तांबे यांनी सोमवार (दि.२९) रोजी धुळ्यात व्यक्त केले.
धुळे येथे शिक्षकांच्या विविध प्रश्नां संदर्भात सोमवार (दि.२९) रोजी त्यांचे आगमन झाले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नां संदर्भात आपले मत मांडले. सध्यस्थितीत शिक्षण क्षेत्र मोठ्या अडचणीतून जात आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था चालक व शिक्षणाचा फायदा घेणाऱ्या समाज व्यवस्थेवर नाराज आहेत. या क्षेत्राकडे सरकारचे लक्ष नाही. गेल्या 25 ते 30 वर्षात शिक्षण आणि आरोग्याकडे सरार्सपणे दुर्लक्ष होत आहे.
यंदाच्या बजेटमध्ये देखील शिक्षणावर भरीव असे काही दिसले नाही. या देशातील सर्वच घटक आणि संस्था सरकारवर अवलंबून आहेत. त्यामुळेच अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षण क्षेत्रात फी वाढ, शिक्षक भरती, संस्था चालकांचे प्रश्न, शिक्षकांचे असणाऱ्या जुन्या पेन्शनचे प्रश्न अशी गुंतागुंत करून ठेवली आहे. त्यातच शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडे कोट्यावधी रुपयांची रोकड सापडणे, अशा दुर्दैवी घटना पुढे येत असल्यामुळे या क्षेत्राबद्दल नाराजीचा सूर उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक समाजातील एक घटक असा आहे त्याला अजूनही संधीची गरज आहे. मराठा समाजातील मोठा घटक आज देखील वंचित असून त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार सर्व जातींची जनगणना झाली पाहिजे. गेल्या 75 वर्षात कोणाला किती लाभ झाला याची देखील चर्चा यातून होऊ शकते. मागास, आदिवासी, ओबीसी यांना सरकारच्या माध्यमातून लाभ दिला गेला. या सर्व वर्गामध्ये देखील एक मोठा वर्ग अजूनही लाभापासून वंचित आहे. जातीय जनगणना गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाली असताना अशा पद्धतीचे ऑडिट झालेच पाहिजे. ज्यांना संधी देणे आवश्यक आहे, अशा सर्व वर्गांना संधी मिळाली पाहिजे, असे देखील तांबे यांनी यावेळी सांगितले.
राज्यात बड्या नेत्यांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपा संदर्भात आमदार तांबे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सध्या मनाला वेदना देणारे राजकारण सुरू आहे. कोणतेही पक्षाचे असो कुणा एकाला दोषी ठरवता येणार नाही. आरोप प्रत्यारोपाचे राजकारण 2019 पासून मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांना एकमेकाला खाली पाहणे. अशा प्रकारे परिस्थिती तयार झाली आहे. दोन्ही बाजूंच्या यात चुका आहे. राज्याच्या भविष्याच्या हे हिताचे नाही. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे राजकारण पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याचे दिसून आले. 2014 आणि 2019 मध्ये मतदार उमेदवाराची चर्चा करत नव्हते. पंतप्रधान कोण असावा, अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान झाले होते. मात्र आता उमेदवाराच्या मेरिट डिस मेरिट बरोबरच स्थानिक प्रश्न देखील चर्चेला आले. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. आता आगामी विधानसभेत स्थानिक व राज्यस्तरीय प्रश्न या दोघांचा बॅलन्स असला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.