Dhule Unseasonal rain compensation
धुळे: धुळे ग्रामीणमध्ये निसर्गाचा लहरीपणा आणि काल झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके आता काढणीला आली होती. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत स्वप्ने होती, पण निसर्गाने सर्व काही हिरावून नेले. प्रत्यक्ष बांधावर जाऊन आमदार राम भदाणे यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकर्यांच्या डोळ्यांतील आसवे पाहून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सरकार तुमच्या पाठिशी आहे. अस्वस्थ होवू नका. सर्वपरी मदत करण्यासाठी कटीबध्द असल्याचे आमदार भदाणे यांनी सांगितले.
धुळे ग्रामीणमधील उडाणे, गोताणे, आनंदखेडे, कुसूंबा, लोणखेडी, कावठी, मेहरगाव, वार, निमडाळे, गोंदूर आदी शिवारांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मका, गहू, ज्वारी, बाजरी, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही उभी पिके वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे जमिनीवर भुईसपाट झाली आहेत. गारपिटीमुळे कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. चारा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे.
आमदार राम भदाणे यांनी सांगितले, शेतकर्यांनी कष्टाने फुलवलेली शेती डोळ्यांदेखत मातीमोल होताना पाहून मन सुन्न झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ते पुर्ण होतीलच. नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. शेतकर्यांनी अस्वस्थ होवू नये. सरकार तुमच्या पाठीशी आहे. शेतकरी बांधवांनो, हा काळ कठीण आहे. पण तुम्ही एकटे नाहीत. तुमचा हा लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जोपर्यंत प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विविध शिवारांमधील पंचनाम्या प्रसंगी आमदार राम भदाणे, तहसीलदार अरुण शेवाळे, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब देसले आदी लोकप्रतिनीधी, स्थानिक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.