पिंपळनेर,जि.धुळे: साक्री तालुक्यातील काननदी काठावरील दहिवेल, सातरपाडा, भोनगांव, बोदगांव, आमोडे, किरवाडे, सुरपान, घोडदे, ढोलीपाडा, अष्टाणे, छडवेल पखरुन, कावठे व साक्रीशहर इ. गावांना उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
नदी काठच्या विहीरीच्या पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. मनुष्य जीवनाबरोबर पशुपक्षी, जनावरांचे देखील पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. कान नदी काठावरील गावातील व परीसरातील ग्रामस्थ, लोकप्रतिनीधी यांनी आमदार गावीत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. कान नदी काठालगत असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठायला सुरुवात झाली आहे. गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यास ग्रामपंचायतींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अशावेळी मालणगाव धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केलेले पाणी कान नदी पात्रातून सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार मंजुळा गावीत यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे लेखी पत्राद्वारे करून साक्री तालुक्यातील कान नदी काठालगतच्या गावांना भविष्यात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेता मालनगाव या प्रकल्पातून 15 ते 20 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत आदेश पारित करावे असे पत्र देण्यात आले आहे.