धुळे : प्रस्तावित मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी लागणारी धुळे तालुक्यातील जमीन अधिग्रहित होणार असून यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. महामार्गामध्ये गेलेल्या जमिनींप्रमाणेच रेल्वे प्रशासनाने योग्य मोबदला दिल्याशिवाय जमिनी न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रस्तावित मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या कामाला खिळ बसली आहे.
धुळे तालुक्यातील बाळापुर ते पुरमेपाडा दरम्यान प्रस्तावित मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या कामासाठी जमीन मोजणीचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या आणि राज्य शासनाच्या धोरणाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
मनमाड–इंदूर (बाळापूर ते पुरमेपाडा) प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी करण्यात येणाऱ्या शासकीय संयुक्त मोजणीला संतप्त शेतकऱ्यांनी विरोध करत काम बंद पाडले. शेतजमिनीच्या मोबदल्याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट घोषणा करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धुळ्याच्या उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून मोजणीसाठी गेलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून स्पष्ट भूमिका जाहीर करत नसल्याने या शेतकऱ्यांनी मोजणीचे काम थांबवले आहे.
शेतकऱ्यांनी संघर्ष समिती तयार केली असून या समितीच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करणे सुरूच ठेवले आहे. आपला विकासाला कोणताही विरोध नसून महामार्गासाठी जमीन अधिग्रहण केली गेली, या शेतकऱ्यांना भूसंपादनानंतर मोबदला दिला गेला. मात्र आता रेल्वेसाठी संपादित होणाऱ्या जमिनींना तुटपुंजा मोबदला दिला जातो आहे. विशेष म्हणजे एन ए झालेल्या जमिनीमधून देखील काही ठिकाणी हा रेल्वे मार्ग जात असल्याने या जमिनींना देखील तुटपुंजा मोबदला दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी रेल्वे मार्ग साठी लागणारी जमीन संपादित झाल्यानंतर शेतकरी भूमिहीन होणार आहे. तसेच शेताच्या मध्यभागातून रेल्वे मार्ग जाणार असल्याने जमिनीचे दोन तुकडे होणार आहे. त्यामुळे जमीन कसण्यासाठी देखील अडचणी निर्माण होणार असल्याचे शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील शेतकऱ्यांची बाजू समजून घेत यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेषता केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच केंद्रातील जबाबदार मंत्र्यांसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची भूमिका देखील गोटे यांनी घेतली आहे. मात्र अद्याप प्रशासनाने भूसंपादित होणाऱ्या जमिनींच्या मोबदल्या संदर्भात ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्याकडून केला जातो आहे. त्यामुळेच या रेल्वे मार्गाला मोजणीसाठी आपला विरोध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही तफावत दूर करण्यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर केली पाहिजे , त्याशिवाय आपण जमीन देणार नाही .यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील करण्याचा इशारा दिला जात असून या आंदोलनातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे.