Mahavitaran Warning File Photo
धुळे

Dhule news | सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा

4349 पाणीपुरवठा योजनांकडे 481 कोटींची थकबाकी,5633 पथदीप ग्राहकांकडे 476 कोटींची थकबाकी

पुढारी वृत्तसेवा

धुळे : महावितरणच्या जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील 4 हजार 349 सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे तब्बल 481 कोटी रुपयांची तर 5 हजार 633 पथदीप ग्राहकांकडे 476 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. आता वसुलीसाठी महावितरणने कठोर भूमिका घेतली असून, वीजबिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना तसेच पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो.

महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी संबंधित विभागांशी वारंवार संपर्क साधण्यात आला आहे. प्रत्यक्ष भेटी, पत्रव्यवहार, स्मरणपत्रे तसेच मोबाईल संदेशांच्या माध्यमातून वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई अपरिहार्य ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक निर्देशही देण्यात आले आहेत.

जळगाव मंडलातील 2339 योजनांकडे 287 कोटी 24 लाख, धुळे मंडलातील 1162 पाणी योजनांकडे 135 कोटी 35 लाख तर नंदुरबार मंडलातील 848 योजनांकडे 59 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच जळगाव मंडलात 2757 पथदीप ग्राहकांकडे 181 कोटी 58 लाख, धुळे मंडलात 1408 पथदीप ग्राहकांकडे 137 कोटी 3 लाख तर नंदुरबार मंडलातील 1468 पथदीप ग्राहकांकडे 157 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे.

चालू आर्थिक वर्ष संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक असल्याने महावितरणने वसुली मोहिमेला अधिक गती दिली आहे. मार्च महिन्याचे आर्थिक महत्त्व लक्षात घेता, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाणीटंचाईची तसेच रस्त्यांवर अंधाराची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी तातडीने पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT