धुळे : शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हा संदेश देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळ्यातील आंबेडकरी युवकांनी यंदाही “एक वही एक पेन” हा सामाजिक उपक्रम आयोजित केला. शहरातील नागरिक आणि अनुयायांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत महामानवास अभिवादन केले.
दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठी गर्दी होते. अनेक जण अभिवादनासाठी विविध वस्तू अर्पण करतात. मात्र नाशवंत वस्तूंऐवजी गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल असे शालेय साहित्य जमा करण्यात यावे, या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून “एक वही एक पेन” हा उपक्रम राबवला जातो. यंदाही विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि आंबेडकरी युवकांनी हा उपक्रम संयुक्तपणे पार पाडला.
धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हा उपक्रम नेहमीप्रमाणे आयोजित करण्यात आला. दिवंगत विशाल संजय पगारे यांच्या स्मरणार्थ यावेळी साहित्य संकलन करण्यात आले. कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष पप्पू पगारे, विनोद केदार, सनी सोनवणे, नागिंद मोरे, सिद्धार्थ वाघ, सुगत मोरे, भदंत मोरे, शंकर खरात, दिलीप साळवे, शोभा चव्हाण, आनंद लोंढे, किरण गायकवाड, राज चव्हाण, किशोर पाटील, रूपक बिरारी, किरण इशी, भैय्या खरात, दीपक जाधव, राहुल पवार, प्रतीक चव्हाण, मदन बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.