बिबट्याचे तीन बछडे छाया:अंबादास बेनुस्कर
धुळे

Dhule Leopard cubs found sugarcane|उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे; पिंपळनेरचे वनविभाग अलर्ट, परिसरात बसविले कॅमेरे!

उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे पिंपळनेर चे वनविभाग अलर्ट, परिसरात बसविले कॅमेरे!

पुढारी वृत्तसेवा

अंबादास बेनुस्कर, पिंपळनेर : साक्री तालुक्यातील नांदवन शिवारात ऊसतोडणी सुरू असताना शेतात अवघ्या आठ ते दहा दिवसांची बिबट्याची तीन नवजात पिले आढळून आली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुपारी बाराच्या सुमारास अचानक ही छोटी पिल्ले समोर आल्याने ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, शेतमालकाने दाखवलेली प्रसंगावधानता आणि वनविभागाच्या पथकाने घेतलेली तातडीची धाव यामुळे मोठा अनर्थ टळला. आता पिलांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

साक्री तालुक्यातील कासारे येथील रहिवासी विजय दगाजी देसले यांचे नांदवन शिवारात उसाचे क्षेत्र आहे. त्यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास मजुरांना उसाच्या फडात बिबट्याची तीन छोटी पिले दिसून आली. कामाच्या गडबडीत अचानक बिबट्याची पिल्ले दिसल्याने मजुरांची चांगलीच धांदल उडाली.

ही बाब लक्षात येताच शेतमालक विजय देसले यांनी वेळ न दवडता पिंपळनेर येथील वनविभागाचे आरएफओ ओंकार ढोले यांना फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून आरएफओ ओंकार ढोले यांनी तात्काळ वनपाल आर. व्ही. चौरे, दयाराम सोनवणे, अनिल घरटे, सोनाली पावरा, राकेश पावरा, सुरेश पावरा आणि रवींद्र माळचे यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शेतात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.

मादी बिबट्या पुन्हा आपल्या पिलांना घेऊन जाईल, या उद्देशाने पिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच ठिकाणी एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच पिलांच्या आणि मादी बिबट्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दरम्यान, परिसरातील शेतकरी आणि ऊसतोड मजुरांनी सतर्क राहावे व एकट्याने शेतात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT