पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील चिकसे, जिरापूर शिवारात रात्री प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या गटखळ नदी तीरावर असलेल्या राहत्या घराजवळील वाड्यातील सहा शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला. यामध्ये जागेवरच बिबट्याने तीन शेळ्या फस्त केल्या तर तीन शेळ्या वाड्यातून उचलून नेल्या आहेत. उचलून नेलेल्या शेळ्यांचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे चिकसे जीरापुर शिवारात रात्रीच्या शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शिवारात बिबट्याचे नर-मादी व एक पिल्लू असल्याचे दिसून आले आहे.
बिबट्याना जेरबंद करण्यासाठी (उबाठा) शिवसेनेतर्फे वन खात्याला निवेदन देण्यात आले. त्यानुसार वनविभागाचे वनपाल संदीप मंडलिक, वनरक्षक अधिकार पदमोर, अमोल पवार, सुमित कुवर, लखन पावरा यांनी गेल्या दोन दिवसापासून शेत शिवारात स्वतः गस्त घातली. त्यांना एक नर आणि मादी बिबट्या दिसले. त्यांचे छायाचित्र कॅमेरात कैद झाले असून एक पिल्लू चुकले असल्याचे त्यांनी सांगितले.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने फटाके फोडुन हिंस्त्र प्राण्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. रात्री चिकसे गावाला लागून गटकळ नदी तीरावर जीरापूर शिवारात प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या शेतातील वाड्यातील सहा शेळ्या या बिबट्यांनी फस्त केले आहे. त्यातील दोन शेळ्या या गर्भवती होत्या. बिबट्याने जागेवरच तीन शेळ्यांचा फडशा पाडला तर तीन शेळ्या उचलून नेल्या. चिकसे व जिरापूर शिवारात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते. मात्र हिंस्र प्राण्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वाड्याजवळच या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबामध्ये लहान बालके, महिला व पुरुष आहेत. बिबट्याने आज शेळ्या फस्त केल्या उद्या माणसांवर हल्ला होऊ शकतो. बिबट्यांचा वावर डॉक्टर ज्ञानेश्वर पगारे व यांच्या शेतातील घनदाट 2 जाळीमध्ये असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. वन विभागातर्फे घटनेचा पंचनामा करून शुक्रवार (दि.21) रोजी रात्रीपर्यंत गस्त सुरू होती. यावेळी शिवसेना उबाठाचे पिंपळनेरचे विभाग 2 प्रमुख तुषार सोनवणे यांनीही घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.