धुळे : धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटी लि. धुळेच्या चेअरमनपदी लहू काशिनाथ पाटील यांची तर व्हा.चेअरमनपदी पोपट सहादू शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटी या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक दि.7 जुलै रोजी घेण्यात आली होती. या निवडणूकित आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने भाजपाच्या पॅनलला धोबीपछाड देत 17 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळविला होता. तर भाजपाच्या सर्व उमेदवारांवर अनामत जप्त करण्याची नामुष्की ओढावली होती.
दरम्यान आज संस्थेच्या कार्यालयात चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी लहू काशिनाथ पाटील रा.तरवाडे यांची तर व्हा.चेअरमन म्हणून पोपट सहादू शिंदे रा.उडाणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या बैठकीला जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी,नवनिर्वाचित संचालक गवळी संभाजी सिंधुजी, गिरासे इंद्रसिंग नथुसिंग,बापू नारायण खैरनार, चौधरी विलास वंसतराव,नांद्रे रमेश दत्तात्रय, कैलास हिंमतराव पाटील, दिनकर दौलत पाटील, भटू गोरख पाटील, रोहिदास विठ्ठल मराठे, चुडामण सहादू पाटील, पंढरीनाथ बुधा पाटील,चौधरी सुशिलाबाई भगवान, पाटील अनिता योगेश, पाटील लहू काशिनाथ, पाटील सुनिल यादवराव,पोपट सहादू शिंदे, अरविंद भालचंद्र शिरसाठ हे उपस्थित होते. नवनियुक्त चेअरमन आणि व्हा.चेअरमन यांचा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संचालक साहेबराव खैरनार, संतोष पाटील आदींनी सत्कार केला. नवनियुक्त चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे माजी मंत्री रोहिदास पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
चेअरमन म्हणून निवड झाल्यानंतर लहू पाटील यांनी सांगितले की, आ.कुणाल पाटील यांनी टाकलेला विश्वास पूर्णपणे सार्थकी लावणार, आ.पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार सर्व संचालक मंडळांच्या सहकार्याने धुळे खरेदी विक्री सोसायटी राज्यात अव्वल क्रमांकात आणणार आणि खरेदी विक्रीच्या माध्यमातून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. असे चेअरमन पाटील यांनी सांगितले.