Dhule drought News  Pudhari photo
धुळे

Dhule drought News | धुळे तालुक्यात दुष्काळाची भीषण दाहकता, माजी आ. कुणाल पाटील थेट शेतकर्‍यांच्या बांधावर

माझा लढा शेतकर्‍यांसाठीच, धीर सोडू नये -माजी आ.कुणाल पाटील

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे तालुक्यात दुष्काळाची भीषण दाहकता असून माजी आ. कुणाल पाटील यांनी थेट शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पिक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेत दिलासा दिला. धुळे तालुका आणि जिल्हा दुष्काळी जाहिर करुन शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून निवेदनही दिले आहे. शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला असून चिंताग्रस्त आहे. माझा लढा हा शेतकर्‍यांसाठी असून शेतकर्‍यांनी धीर सोडू नये, मी शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रत्येक संकटात सोबत आहे असे सांगत कुणाल पाटील यांनी बळीराजाला दिलासा दिला.

धुळे तालुक्यात पावसाने पाठ फीरविल्याने खरीपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. पावासाचा मोठा खंड पडल्याने पिके होरपळून गेली आहेत. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास दुष्काळाने हिरावून घेतला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर माजी आ .कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्याची दुष्काळी परिस्थिती जाणून घेतली. ते थेट शेतकर्‍यांच्या शेतशिवारात जावून पहाणी केली.

धुळे तालुक्यातील चिंचवार, सैताळे, शिरधाणे प्र.नेर, नवलाणे, मेहरगाव, लामकानी या भागात जाऊन दुष्काळाने बाधीत झालेल्या पिकांची पहाणी केली. दुष्काळीची झळ संपूर्ण धुळे तालुक्याला बसलेली असून खरीपाची पिके पावसाअभावी करपल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाहणी दौर्‍यात कुणाल पाटील यांनी मका, कपाशी, भूईमुग, बाजरी, ज्वारी,कांदा इत्यादी खरीपाच्या पिकांची पाहणी केली.

अत्यल्प पाऊस आणि पावसाचा मोठा खंड यामुळे पिकांची वाढ खुंटली. परिणामी शेतकर्‍यांना कोणतेही उत्पन्न खरीपाच्या पिकांपासून येणार नाही. खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी मशागत, पेरणी, खते, बी बियाणेसाठी हजारो-लाखो रुपये खर्च केले, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि आता दुष्काळामुळे शेतकर्‍यांचा हा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.

दुष्काळाच्या पहाणी दरम्यान माजी आ.कुणाल पाटील यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत धीर दिला. याप्रसंगी दुष्काळात उद्भवणार्‍या प्रश्‍नांच्या व्यथा शेतकर्‍यांनी मांडल्या. शेतकर्‍यांच्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढला जाईल असे सांगत दिलासा दिला.

पाणी व चारा टंचाईवर तोडगा

अत्यल्प पावसामुळे नदी नाले कोरडेठाक पडले आहेत. विहीरी, कुपनलिका हे पाण्याचे स्त्रोतही आटले आहेत. परिणामी दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. धुळे तालुक्यात शेतीनंतर शेतकर्‍यांचा दुय्यम व्यवसाय हा पशुपालनाचा आहे. मात्र दुष्काळामुळे चारा टंचाई निर्माण होणार असून पशुपालनाचा व्यवसायही धोक्यात आला आहे. तसेच पाण्याचे स्त्रोत आटल्याने भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. म्हणून शासनाने भविष्यात उद्भवणारी पाणी टंचाई व चारा टंचाईवर शासनाने तोडगा काढावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली असल्याचे कुणाल पाटील यांनी शेतकर्‍यांशी बोलतांना सांगितले आहे.

माझा लढा शेतकर्‍यांसाठी

धुळे तालुका आणि जिल्हा दुष्काळी जाहीर करुन मदतही जाहीर करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती. यावेळी दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत जाहीर करावी तसेच दुष्काळाच्या सवलती लागू कराव्यात, अशीही मागणी केली आहे. सरकारने दुष्काळात प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करुन द्यावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. भाजप महायुती सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना मदत व्हावी, म्हणून मी शेतकर्‍यांसाठी लढणार असल्याचे त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधतांना सांगितले.

सरसकट पंचनामा करा

धुळे तालुक्यातील पिक परिस्थिती गंभीर असून दुष्काळामुळे पिके करपून गेली आहेत. परिणामी, शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यात पंचनामे सुरु झाले आहेत. धुळे तालुक्यातही दुष्काळातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनीही पंचनामा करताना सरसकट पंचनामा करुन घ्यावा, असे यावेळी शेतकर्‍यांशी चर्चा करतांना मा. आ. पाटील यांनी सांगितले.

वीज पुरवठा सुरळीत करा

दुष्काळी पहाणी दरम्यान कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी कुणाल पाटील यांच्याकडे केली. दुष्काळात आहे ती पिके वाचावीत म्हणून शेतकरी पिकांना कृषी पंपाद्वारे पाणी देत आहे. मात्र वारंवार खंडीत होणार वीज पुरवठा, तांत्रिक बिघाड यामुळे कृषी पंपाना सुरळीत वीज पुरवठा होत नाही, म्हणून धुळे तालुक्यातील कृषी पंपांना अखंडीत व सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या सूचना अधिक्षक अभियंता म.रा.वि.कं.लि. यांना दिल्या आहेत. याबाबत मा. आ. पाटील यांनी आपले पत्र वीज वितरण विभागाला दिले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत बाजार समितीचे सभापती योगेश पाटील, लामकानी माजी सरपंच धनराज महाले, माजी सरपंच बाजीराव महाले, माजी जि.प.सदस्य अरुण पाटील, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, सैताळे उपसरपंच सुनिल पाटील, माजी सरपंच रविंद्र मराठे, सरपंच गिरधर मोरे, भाजपयुमोचे सरचिटणीस गणेश गर्दे,आबा पगारे,बन्सीलाल पाटील, भाऊसाहेब देसले, रहिम पटेल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT