धुळे : सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या निवडणुकीत आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने सर्व 17 जागांवर दणदणीत विजय मिळवला. (छाया : यशवंत हरणे)
धुळे

Dhule News | खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत जवाहर पॅनलचा विजय

जवाहर पॅनलचा दणदणीत विजय, भाजपाला पराभवाची धूळ

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या निवडणूकीत आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने सर्व 17 जागांवर दणदणीत विजय मिळवून भाजपाच्या पॅनलला धोबीपछाड दिली आहे. या निवडणुकीत भाजपच्या पॅनलच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे.

जवाहर शेतकरी विकास पॅनलने सर्व जागांवर प्रचंड मताधिक्क्याने दणदणीत मतांनी विजय मिळविला आहे. या निकालामुळे धुळे बाजार समिती व धुळे लोकसभेतील पराभवानंतर खरेदी विक्री सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे. खरेदी विक्री संघावर विजय मिळवित आ. पाटील यांचे धुळे तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. दरम्यान निकालानंतर आ.कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. मतमोजणी केंद्रपासून ते आ.पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत आ.कुणाल पाटील, रायबा कुणाल पाटील यांच्यासह विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या निवडणूकिसाठी गुरुवार (दि.४) राेजी धुळे येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय येथे मतदान झाले. मतदानानंतर लगेच सायंकाळी 4 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीप्रणित जवाहर शेतकरी विकास पॅनल आणि माजी खा. डॉ.सुभाष भामरे यांच्या भाजपाच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली. आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलतर्फे दोन उमेदवार बिनविरोध झाले होते. उर्वरित 15 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकित आ.कुणाल पाटील यांच्या पॅनलच्या सर्व म्हणजे 15 उमेदवारांचा प्रचंड मताधिक्क्याने दणदणीत विजय झाला. तर भाजपाच्या उमेदवारांना पुन्हा एकदा पराभवाची धुळ चाखावी लागली आहे.

आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीतही त्यांनी भाजपाच्या पॅनलचा सर्व जागांवर पराभव केला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीतही भाजपाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली संस्था म्हणून धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीकडे पाहिले जाते. संपूर्ण धुळे ग्रामीण मतदारसंघातून सेवा सोसयटीचे एक प्रतिनिधी आणि व्यक्तीश: सभासदांचे मतदान या निवडणूकीत आहे. त्यामुळे मतदारांनी आ.कुणाल पाटील यांच्या पॅनलला कौल देत त्यांचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. परिणामी या विजयामुळे धुळे तालुक्यावर आ.कुणाल पाटील यांनी आपले पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे.

विजयी उमेदवार असे...

जवाहर शेतकरी विकास पॅनलचे बापू नारायण खैरनार (एकूण मिळालेली मते 106), गवळी संभाजी सिंधुजी (एकूण मिळालेली मते 108), गिरासे इंद्रसिंग नथुसिंग (एकूण मिळालेली मते 102), चौधरी विलास वंसतराव (एकूण मिळालेली मते 107), नांद्रे रमेश दत्तात्रय (एकूण मिळालेली मते 105), पाटील कैलास हिंमतराव (एकूण मिळालेली मते 109), पाटील दिनकर दौलत (एकूण मिळालेली मते 109), पाटील भटू गोरख(एकूण मिळालेली मते 104), पाटील रोहिदास विठ्ठल (एकूण मिळालेली मते 103), मराठे चुडामण सहादू (एकूण मिळालेली मते 101), पाटील पंढरीनाथ बुधा (एकूण मिळालेली मते 545), चौधरी सुशिलाबाई भगवान (एकूण मिळालेली मते 542), पाटील अनिता योगेश (एकूण मिळालेली मते 550), पाटील लहू काशिनाथ (एकूण मिळालेली मते 426), पाटील सुनिल यादवराव(एकूण मिळालेली मते 389) हे सर्व उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे माजी मंत्री रोहिदास पाटील, आ.कुणाल पाटील, अश्‍विनी पाटील, शिवसेना नेते महेश मिस्तरी, रायबा कुणाल पाटील यांनी कौतुक केले.

दोन उमेदवार बिनविरोध

आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी विकास पॅनलचे दोघे उमेदवार धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या माघारीअंती आधीच बिनविरोध निवडून आले होते. विरोधी भाजपा प्रणित पॅनलला दोन जागांवर उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात भटक्या विमुक्त मागास प्रवर्गातून पोपट सहादू शिंदे रा.उडाणे आणि अनुसूचित जाती/ जमाती मतदारसंघातून अरविंद भालचंद्र शिरसाठ रा. धनुर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

विजयी जल्लोष

धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या निवडणूकित सर्व जागांवर आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतीषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला. विजयाचा जयघोष करीत परिसर दणाणून निघाला होता. दरम्यान आ.कुणाल पाटील आणि रायबा कुणाल पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. देवूपरातील मतमोजणी केंद्रापासून ते आ.पाटील यांच्या घरापर्यंत विजयी मिरवणूक निघाली होती.

धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीत जवाहर शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय हा शेतकरी आणि सभासदांनी टाकलेल्या विश्‍वासामुळे झाला आहे. त्यामुळे हा विजय शेतकरी व सभासदांचा आहे. खरेदी विक्री सोसायटीचा कारभार उत्तमप्रकारे सुरु असून येत्या पाच वर्षात महाष्ट्रातील अव्वल दर्जाची खरेदी विक्री सोसायटी करुन दाखवेल. शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविल्या जातील. शेतकर्‍यांचा जास्तीत जास्त शेतीमाल खरेदी करुन रास्त भाव देण्याचा प्रयत्न केले जातील. त्यामुळे शेतकर्‍यांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही.
कुणाल पाटील, आमदार.

विजयी मिरवणूकीनंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आ. पाटील यांच्या देवपूर येथील संपर्क कार्यालयातील सभागृहात झालेल्या विजयी सभेत ते बोलत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT