धुळे : जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाला लवकर सुरुवात करावी, या मागणीसाठी कॉरिडॉर विकास समितीच्या सदस्यांनी सोमवारी (दि.२१) पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र भदाणे यांची भेट घेतली. धुळे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या गुंतवणूक परिषदेवेळी इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाचे अधिकारी व उद्योजकांना एकत्र आणून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी समितीला दिेले.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीज कॉरिडॉर प्रकल्पासाठी समिती गेल्या दहा वर्षापासून रणजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाला चालना देण्यात यावी तसेच भूसंपादन लवकर करण्यात यावे, यासाठी शिष्टमंडळाने धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाने यांची भेट घेऊन त्यांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल व आमदार अनुप अग्रवाल यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून लवकरात लवकर जमिनीचे स्थळ पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी यावे, असे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. २८ एप्रिल रोजी धुळे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या गुंतवणूक परिषदेच्या वेळी इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाचे अधिकारी व उद्योजकांना एकत्र आणून पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या भेटीच्या वेळेस पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल,आमदार राघवेंद्र भदाने यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्ही पाठपुरावा करू व येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरू करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प हा धुळे शहराला लागून असलेल्या दहा गावांच्या हद्दीमध्ये होणार आहे. जवळपास १५ हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे धुळे शहर व जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो. यावेळी समितीचे प्रमुख रणजीत भोसले, दादा कोर, राजेंद्र खैरनार, श्याम भामरे, रईस काजी, हरीश शेलार, विजय पाटील, पी सी पाटील, दिलबागसिंग राजपूत, निखिल ठाकरे, प्रभाकर पवार, कुणाल वाघ, महेंद्र शेंडगे, मनोज घोडके, वैभव पाटील आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.