धुळे : पुढारी वृत्तसेवा ; शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विदयमान आमदार तथा माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे. तालुक्यातील 13 पैकी 11 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीने आपली वर्चस्व सिद्ध केले आहे.
शिंदखेडा मतदारसंघात आ.जयकुमार रावल यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांचा जिल्हा परीषद, पंचायत समिती, बाजार समिती, दुध संघ, खरेदी विक्री संघ अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थावर एकतर्फी सत्ता आहे, ग्रामपंचायत निवडणुकीत 13 ग्रा.पं.पैकी 11 ग्रा.पं.वर त्यांच्या पॅनलने विजय संपादन केला असून पथारे आणि अंजनविहीरे या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर उर्वरीत 11 पैकी 9 ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. यात गव्हाणे, होळ, वाडी, साळवे, परसामळ, कंचनपूर, कदाणे, वालखेडा, वाघोदे आदी ग्रा.पं. भाजपची सत्ता आली असून उर्वरीत मांडळमध्ये कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पॅनलचा विजय झाला असून तावखेडा मध्ये देखील स्थानिक विकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे.
निकालानंतर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, तालुकाध्यक्ष दिपक बागल, बाजार समितीचे संचालक किशोर पाटील यांच्यासह सर्व कार्यकत्या्र्ंनी शिंदखेडा येथील भाजपा कार्यालयात जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.