धुळे

Dhule News : धुळेकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात लवकरच धावणार २८ ई-बस; चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड मिळणार असून, शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या २८ अत्याधुनिक ई-बस लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

९० टक्के काम पूर्ण

मोहाडी येथील रेसिडेन्सी पार्कजवळ सुमारे २.५० हेक्टर जागेवर ई-बस चार्जिंग स्टेशन, बस पार्किंग, तांत्रिक आणि प्रशासकीय कक्ष उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. सुमारे ६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, आता केवळ अंतिम टप्प्यातील कामे शिल्लक आहेत. खासदार डॉ. बच्छाव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन चार्जिंग यंत्रणा, पार्किंग व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल सादर केला.

९ मार्गांवर ई-बसची सेवा

शहरासाठी मंजूर झालेली ही ई-बस सेवा एकूण ९ विविध मार्गांवर धावणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, पारंपरिक डिझेल बसेसच्या तुलनेत ई-बसमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणात मोठी घट होऊन पर्यावरण रक्षणास मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे शहराच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळणार आहे.

लवकरच सेवा सुरू करण्याचे निर्देश

प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांसाठी ई-बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना खासदार डॉ. बच्छाव यांनी दिल्या. ही सेवा सुरू झाल्यानंतर धुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक नवी ओळख प्राप्त होणार आहे.

प्रमुख उपस्थिती

या पाहणी दौऱ्यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त हेमंत निकम, कार्यकारी अभियंता चंद्रकांत उगले, तसेच इतर अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज कारणकाळ, शहराध्यक्ष हाजी साबीर शेठ, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले आणि सुनील शिंदे हे देखील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT