धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेतर्फे बाजार समितीत आयोजित सत्कार समारंभात आमदार अनुप अग्रवाल बोलत होते Pudhari News Network
धुळे

धुळे बाजार समितीत शेतकरी भवनासाठी प्रस्ताव द्या, निधी मी आणतो – आमदार अनुप अग्रवाल

हमाल-मापाडींच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवणार

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भवनाची सध्याची दुरवस्था पाहता, शेतकऱ्यांच्या निवासासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी नवे शेतकरी भवन उभारण्याचा प्रस्ताव द्या, मी ३ ते ४ कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देतो, असे आश्वासन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिले.

धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेतर्फे बाजार समितीत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती यशवंत खैरनार, उपसभापती नानासाहेब पाटील, हमाल संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर, संचालक भागवत चिळकर, माजी नगरसेवक अमोल मासुळे आदी उपस्थित होते.

आमदार अग्रवाल म्हणाले की, भवनाच्या दुरुस्तीसाठी किंवा नवीन जागेवरील बांधकामासाठी प्रस्ताव द्या. कामगारांच्या बैठकीसाठी भवनाच्या खालच्या मजल्यावर सभागृहही असावे. तसेच कामगार भवनासाठीही मी निधीसाठी प्रयत्न करीन. संघटनेने तातडीने प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करावा. शेतमाल थेट शेतावर खरेदीचा निर्णय झाला असला, तरी बाजार समितीचा परवाना असलेल्यांनाच खरेदी करता येणार आहे. त्यामुळे हमाल-मापाडींच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवणार आहे.

शहरातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा घेत ते म्हणाले, रावेर परिसरात दोन हजार एकर जागेवर एमआयडीसीसाठी प्रस्ताव दिला आहे. साडेआठ हजार कोटींच्या उद्योगांमुळे हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे. तसेच भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळ अशोक वाटिकेसह १० हजार वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू होणार आहे. कामगारांसाठी सरकारच्या ४५-४६ योजना आहेत. त्यांचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून कोणतीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन, असे अग्रवाल यांनी आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT