धुळे : शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून, त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संबंधित रुग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे.
जीबीएस आजाराने महाराष्ट्रासह देशातील इतर भागांतही शिरकाव केला असून, दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे. धुळे शहरातही जीबीएसचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा विशेष सतर्क झाली आहे. संबंधित रुग्णावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. जीबीएस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आला असून, उपचाराबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. धुळे शहरातही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती प्राप्त होताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांनी तत्काळ हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देत संबंधित रुग्णाची विचारपूस करीत संबंधितावर आवश्यक ते उपचार तातडीने करण्याच्या योग्य त्या सूचना संबंधित डॉक्टरांना केल्या आहेत.