धुळे : धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. या तिघांकडून एकूण १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यापैकी नऊ दुचाकी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून चोरल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
धुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानीय गुन्हे शाखेला याबाबत तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. यामध्ये
प्रकाश पाटील, पो. अं. संजय पाटील, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण आणि प्रल्हाद वाघ यांचा पथकाने वैद्यकीय महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान एका संशयित व्यक्तीचे अनेक वेगवेगळ्या दिवशी उपस्थित राहणे आणि त्याच दिवशी दुचाकी चोरी जाण्याचा योगायोग मिळून आला.
संशय बळावल्याने पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील टोल नाके आणि हॉटेल्सचे फुटेज तपासले तसेच सुरत मार्गावरील हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्या माध्यमातून संशयित दुचाकीवरून जाताना आढळून आला.
पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील वडजाई रोडवरील लॉन्सजवळून सलमान सागीर सैय्यद, अकीब उर्फ बाबा शेख जैनोद्दीन आणि वसीम कलीम शेख यांना अटक करण्यात आली. सखोल चौकशीत त्यांनी चोरी केलेल्या एकूण १३ दुचाकीची कबुली दिली. ज्यामध्ये ९ दुचाकी वैद्यकीय महाविद्यालयातून चोरीस गेलेल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कौशल्याने व तांत्रिक माध्यमांचा वापर करून पार पाडली असून, या टोळीचा पर्दाफाश झाल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना चाप बसण्याची शक्यता आहे.