धुळे : भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या चौघा बांगलादेशी नागरिकांना वेगवेगळ्या कलमान्वये सहा महिने व तीन महिने अशा साध्या कारावासाची शिक्षा धुळ्याच्या न्यायालयाने सुनावली आहे. या चौघा बांगलादेशी नागरिकांकडून जप्त करण्यात आलेली बनावट कागदपत्रे संबंधित विभागाकडून रद्द करण्यात यावी, अशा सूचना देखील न्यायालयाने निकालपत्रात दिल्या आहेत. भारतात बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त होते आहे.
धुळे येथील आग्रा रोडवरील एका लॉजमध्ये बांगलादेशी नागरिक थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार तसेच एटीएसच्या धुळे शाखेला मिळाली. त्यामुळे या दोघा पथकांनी संयुक्तपणे कारवाई करीत या हॉटेलमधील एका खोलीमधून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांची नावे मोहम्मद महताब बिलाल शेख , शिल्पी बेगम कबीर मुंशी, ब्यूटी बेगम मातुब्बर , रिपा माकोल मातुबर असल्याचे स्पष्ट झाले. या चौघांकडे भारतातील रहिवास सिद्ध होतील अशी बनावट कागदपत्रे आढळून आली. हे चौघे बांगलादेशी नागरिक एका एजंटच्या मदतीने बांगलादेश मधून दिल्ली आणि त्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून धुळ्यात आल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे हे चौघेही बांगलादेशी रोजगारासाठी आल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे या चौघांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने आज चौघा बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवले आहे. त्यांना विविध कलमान्वये ३ महिने साधी कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा तर सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.