धुळे : धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून पांझरा नदीच्या उगम क्षेत्रात तसेच अक्कलपाडा प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रापासून लांब राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने शुक्रवारी (दि.५) केले.
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा वाढत आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने सूचना दिल्या आहेत .निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून सद्यस्थितीत १६१२५ क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आलेले असून सायंकाळी उशिरा विसर्ग वाढवून १८२७५ क्युसेक करण्यात येणार आहे. तसेच येवा वाढल्यास पूर्वसूचनेने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. तरी पांझरा नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता यांच्या वतीने करण्यात येत आहे.