धुळे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध सुधारित संकरीत बियाण्यांची निर्मिती होऊन उत्पादन क्षमता वाढत आहे. मात्र, ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी संकरीत बियाण्यांसोबत सेंद्रिय खतांचा वापर करावा, असे आवाहन धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांनी केले.
आमदार राघवेंद्र (राम) भदाणे हे देवपूरमध्ये आयोजित 22 व्या कृषी धान्य महोत्सवाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
महोत्सवात विविध स्थानिक व सुधारित धान्य पिकांचे प्रदर्शन, सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन, कृषी तंत्रज्ञानाची माहिती, शाश्वत शेतीवर चर्चासत्रे आणि कृषी व्यवसायात नवउद्योजकांसाठी संधी यांचे सादरीकरण करण्यात आले. आमदार भदाणे म्हणाले की, “शेतकरी हा अन्नसुरक्षेचा खरा आधारस्तंभ आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख होते, उत्पादनक्षमता वाढते आणि शेतीची उत्पादनक्षमता अधिक वाढते.”
या महोत्सवात 36 स्टॉलधारकांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये 600 क्विंटल धान्य व 2,000 किलो शेतमालावर आधारित प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले. कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा आमदार भदाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी बापू गावित, कृषि विकास अधिकारी चौधरी, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दिनेश नांद्रे तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.