ATM  Pudhari
धुळे

ATM cash deposit fraud: धुळ्यात एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये ५० हजारांच्या बनावट नोटा भरणारा भामटा गजाआड

अहिल्यानगरचा संशयित पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे शहरातील एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये (CDM) चक्क ५०० रुपयांच्या ५० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा भरून बँकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आझाद नगर पोलिसांनी या भामट्याची ओळख पटवली असून, तो अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.

धुळे शहरातील गल्ली क्रमांक ६ मध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेच्या मुख्य शाखेबाहेर कॅश डिपॉझिट मशीन आहे. या मशीनमध्ये जमा झालेली रोकड तपासली असता, एका वेगळ्या बॉक्समध्ये ५०० रुपये मूल्य असलेल्या १०० बनावट नोटा आढळून आल्या. मशीनमधील प्रगत तंत्रज्ञानामुळे खराब किंवा संशयास्पद नोटा आपोआप एका स्वतंत्र सुरक्षित बॉक्समध्ये जमा होतात. या बनावट नोटांमुळे बँक प्रशासनात मोठी खळबळ उडाली.

धक्कादायक बाब म्हणजे, या भामट्याने ५०० रुपयांच्या खऱ्या नोटांऐवजी 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' लिहिलेल्या खेळण्यातील नोटा मशीनमध्ये भरल्या होत्या. या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसत होत्या. मशीनमधील नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दोन व्यक्ती एटीएम कार्डद्वारे व्यवहार करताना दिसून आल्या.

बँकेने माहिती दिल्यानंतर आझाद नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एटीएम कार्डच्या तपशिलावरून आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. सचिन संभाजी पिसोटे (वय २४, रा. सुसारे, जि.प. शाळेसमोर, अहिल्यानगर) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सचिन पिसोटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (२) अ, १७९ आणि १८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि निवृत्ती पवार, आणि पोसई महेश घायतड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई घायतड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT