धुळे : वाढते अतिक्रमण, वाहतुकीचा खोळंबा यासारख्या महत्त्वाच्या समस्यामुळे धुळेकर हैराण झाले आहेत. त्यामुळे आता महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची स्थापना करून त्या माध्यमातून प्रशासनावर दबाव वाढवून या समस्या दूर करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. ही समिती अराजकीय असून तिचा वापर कोणत्याही राजकारणासाठी करता येणार नसल्याची माहिती समितीचे निमंत्रक तथा माजी नगरसेवक कैलास हजारे यांनी दिली आहे.
यावेळी संजय बगदे, मिलिंद सोनवणे, अशोक तोटे, दिलीप उपाध्ये, आदींची उपस्थिती होती. महानगरातील समस्या सोडवण्यासाठी व्यापक बैठक पारोळा रोडवरील रचना सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार बैठकीचे नाव महानगर नागरी संघर्ष समिती असे निश्चित करण्यात आले आहे. ही समिती पूर्णपणे अराजकीय असेल.
त्याचप्रमाणे या समितीचा वापर कुणालाही राजकीय कामासाठी करता येणार नसल्याचे यावेळी ठरवण्यात आले. समितीच्या माध्यमातून शहरातील प्रमुख समस्या प्राधान्याने सोडवण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून शहरातील वाढते अतिक्रमण तातडीने दूर करावे, त्याचप्रमाणे रहदारीची समस्या सोडवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
शहर पोलिसांची शाखा आणि महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक हे समाधानकारक काम करीत नसल्याने यावेळी समितीच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. महानगरपालिकेत स्वतंत्रपणे अतिक्रमण निर्मूलन पथक आहे. मात्र हे पथक नियमितपणे शहरात गस्त घालीत नाहीत. त्यामुळे गल्लीबोळातील अतिक्रमण शहरातील मुख्य रस्त्यांवर देखील वाढले आहे. फेरीवाल्यांमुळे पायी चालणे देखील अवघड होते. त्यामुळे या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता ही संघर्ष समिती कायमस्वरूपी कार्यरत राहणार असून यात महानगरातील कोणत्याही नागरिकाला सदस्य म्हणून सहभागी होता येणार आहे.कैलास हजारे, माहिती समितीचे निमंत्रक तथा माजी नगरसेवक, धुळे.