धुळे | जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानांमार्फत धान्य वितरित केले जाते. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील 15 लाख 665 लाभार्थ्यांचे ई-केवायसी (लाभार्थी प्रमाणीकरण) करणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आता शासनाने ‘मेरा ई-केवायसी’ मोबाइल ॲप कार्यरत केले आहे. त्यामुळे लाभार्थी रास्तभाव दुकानात न जाता घरबसल्या काही मिनिटांतच स्वतःच्या व आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करू शकतात. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना आता घरबसल्या ई केवायसी करण्यासाठी आधार फेस आरडी सेवा ॲप , मेरा ई-केवायसी मोबाईल ॲप असे दोन ॲप कार्यान्वित केले आहे. हे दोन्ही ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावेत.असे आवाहन करण्यात आले आहे.
ॲप उघडून राज्य व ठिकाण निवडा.,
आपला आधार क्रमांक टाका, त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.,
माहिती सत्यापित करून सबमिट करा.,
फेस ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.,
सेल्फी कॅमेरा सुरू झाल्यावर डोळे उघड-बंद करा.,चेहरा स्कॅन होताच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल., यशस्वी ई-केवायसी नंतर मेसेज मिळेल आणि खात्री करता येईल.
जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील एकूण 15 लाख 665 लाभार्थ्यांचे ई-केवायसी (लाभार्थी प्रमाणीकरण) करणे बंधनकारक आहे. त्यापैकी 9 लाख 47 हजार 75 लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घेतली आहे. यात धुळे 3 लाख 68 हजार 778 (66.13टक्के), साक्री 2 लाख 35 हजार 689 (61.81 टक्के), शिरपूर 1 लाख 85 हजार 169 (58.22 टक्के), शिंदखेडा 1 लाख 57 हजार 439 (64.61 टक्के) याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 63.11 टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, अशा लाभार्थ्यांनी 15 मार्च, 2025 पर्यंत आपली ई-केवायसीकरून घ्यावी. ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिका सुविधांवर परिणाम होऊ शकतो. अडचण असल्यास आपल्या रास्तभाव दुकान किंवा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा. वेळेत ई-केवायसी करून तुमच्या धान्य हक्काची खात्री करा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी शेलार यांनी केले आहे