धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेत ऐतिहासिक घडामोड झाली. स्थापनेनंतर प्रथमच नगराध्यक्ष पदासह सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम बिनविरोध करण्यात आला.
ही नगरपालिका 1952 मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून येथे अनेक चुरशीच्या निवडणुका झाल्या. शिंदखेडा तालुक्यात माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख आणि विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांच्यातील दीर्घकालीन वादही ओळखला जातो. या दोन गटांतील संघर्ष निवडणुकांपर्यंत पोहोचत असे. यंदा मात्र मंत्री रावल यांनी डॉ. देशमुख यांच्या गटाला भाजपात सहभागी करून घेतले. त्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेला तणाव संपुष्टात आला आणि दोन्ही गट एकत्र आले. त्यानंतरच येथे सर्व जागा बिनविरोध जाण्याची शक्यता निर्माण झाली.
माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षपदासह 13 प्रभागांतील सर्व 26 जागा बिनविरोध झाल्या. शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, एमआयएम, समाजवादी पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनीही माघार घेतली.
मंत्री रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्षा नयनकुवरताई रावल आणि सात जागांवर बिनविरोध निवड साधली होती. माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 19 जागाही बिनविरोध करण्यात त्यांना यश आले. जवळपास 70 हजार लोकसंख्या असलेल्या या नगरपरिषदेची निवडणूक पहिल्यांदाच पूर्णपणे बिनविरोध पार पडली.