धुळे : दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग– अव्यांग तसेच दिव्यांग–दिव्यांग विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्यात आली आहे. पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांनी केले आहे.
शासन निर्णय दिनांक 17 जून 2024 नुसार दिव्यांग कल्याण विभागाची ही योजना राबविण्यात येत असून, 18 डिसेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये ती अधिक्रमित करण्यात आली आहे. या सुधारित योजनेत कालानुरूप बदल करत दिव्यांग–दिव्यांग विवाहाचा पर्याय नव्याने समाविष्ट करण्यात आला असून, दिव्यांग–अव्यंग विवाहासाठी देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 10 नुसार दिव्यांग व्यक्तींना प्रजननाचा व कुटुंब नियोजनाचा अधिकार आहे. तसेच कलम 24 नुसार दिव्यांग व्यक्तींना समाजात स्वावलंबी जीवन जगता यावे, त्यांना योग्य जीवनमान प्राप्त व्हावे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासनाने आवश्यक योजना व कार्यक्रम राबवावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
योजनेचे स्वरूप असे...
दिव्यांग–अव्यंग विवाहासाठी : 1 लाख 50 हजार रुपये
दिव्यांग–दिव्यांग विवाहासाठी : 2 लाख 50 हजार रुपये
अनुदानाची संपूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल. यापैकी 50 टक्के रक्कम पाच वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवणे बंधनकारक राहील.
योजनेच्या अटी व शर्ती
वधू किंवा वराकडे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाचे वैध यूडीआयडी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी किमान एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. दोघांचाही प्रथम विवाह असावा. घटस्फोटित असल्यास यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. विवाह कायदेशीररीत्या नोंदणीकृत असावा. विवाहानंतर एका वर्षाच्या आत संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार संलग्न वैध यूडीआयडी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पती–पत्नीच्या आधारसंलग्न संयुक्त बँक खात्याचा तपशील (पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत) तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
या योजनेविषयी अधिक माहिती व लाभासाठी पात्र दिव्यांग जोडप्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मनिष पवार यांनी केले आहे.