धुळे : ग्रामविकास विभागाच्या सेवा नागरिकांना तत्परतेने मिळाव्यात, यासाठी कामकाजात पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमता जोपासावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
धुळे पंचायत समितीला भेट देऊन त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. या दौऱ्यात गटविकास अधिकारी गणेश चौधरी उपस्थित होते. श्री. बेलदार यांनी विभागनिहाय आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
या भेटीदरम्यान घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शिक्षण, आरोग्य, बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, ग्रामपंचायत आणि आस्थापना विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच, ई-ऑफिस प्रणाली आणि ग्रामस्थांच्या ऑनलाइन तक्रारींच्या निवारण प्रक्रियेवर चर्चा करून, नागरिकांच्या समस्यांचे वेळेत व प्रभावीपणे निराकरण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती घेत असताना, त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या दौऱ्यांची नियमित पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, विस्तार अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत तपासणीबाबत माहिती घेऊन, नियमित तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तपासणीदरम्यान तक्रारीत तथ्य आढळल्यास, तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार यांनी दिल्या आहेत.