धुळे : जुन्या भांडणातून युवकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२०) शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरातील मानवरोहणी केंद्राजवळ घडली. विनायक उर्फ बारकु काशिनाथ पाटील (वय ३७) असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी विनायक पाटील हा रुहाणी मानव केंद्राजवळ आपल्या शेताकडे जाणाऱ्या रोडावर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला खाजगी रुग्णवाहिकेने शिरपूर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ चुनिलाल जगन्नाथ पाटील याने पोलीस ठाण्यात त्याच्या भावाचा पूर्ववैमनस्यामधून खून झाल्याची तक्रार दिली. दहिवद गावातीलच उमेश उर्फ दादु विश्वनाथ चव्हाण यानेच जुन्या भांडण्याच्या कारणावरुन बारकु काशिनाथ पाटील याला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार दिल्याने उमेश चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे यांनी केली.