धुळे

धुळे : माजी आमदार अनिल गोटे यांनी का दिला देहत्याग आंदोलनाचा इशारा

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा – धुळेकर जनतेला सोयीचा ठरणाऱ्या नगावबारी ते रेल्वे स्टेशन यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याला शासनाने सर्व प्रकारच्या मंजूरी देऊनही कृषी महाविद्यालय, बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे अद्याप काम रखडलेले आहे. त्यामुळे आता 14 जून पासून बांधकाम विभागाच्या समोर देहत्याग आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मंगळवार (दि.१२) रोजी माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे.

धुळे शहरातील जनतेसाठी थेट नगावबारी आणि रेल्वे स्टेशन यांना जोडणारा नवीन रस्ता माजी आमदार अनिल गोटे यांनी शासनाकडे खेट्या मारून मंजूर करून घेतला आहे. या रस्त्याच्या कामाला शासन स्तरावरून तांत्रिक मंजूरी देखील मिळाल्या असून 42 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी महाविद्यालयातील जागेमधून हा रस्ता नेण्यासाठीची मंजुरी देखील दिली. मात्र आता कृषी महाविद्यालय वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून अडवणूक करीत असल्याचा आरोप मंगळवार (दि.१२) रेाजी पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांनी केला. यावेळी लोकसंग्रामचे नेते तेजस गोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख सलीम शेख व अकबर अली यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कृषी महाविद्यालयाचे अधिकारी अडवणूक करत असून कुलसचिव शासकीय काम करण्याऐवजी राजकारण करीत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. त्यामुळे अशा कुलसचिवाची तातडीने बदली करण्याची मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील रस्त्यासाठी चुकीच्या पद्धतीने कृषी महाविद्यालयाने त्यांच्या कार्यालयातील फर्निचरचे काम संबंधित ठेकेदारांकडून करून घेतले. तर आता कृषी महाविद्यालयातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाची अट त्यांनी टाकली आहे. या बरोबरच रस्त्याच्या तांत्रिक मंजुरीत नसलेल्या गोष्टी देखील करण्यासाठी ते भाग पाडत आहेत. महानगरपालिका देखील अशाच पद्धतीने हे काम रखडावे म्हणून काम करीत आहेत. तर बांधकाम विभागाचे धोरण देखील असेच आहे. या तीनही विभागांच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाकडून आलेला निधी परत जाण्याची शक्यता असून या रस्त्याचे काम भविष्यात कधीही होऊ शकणार नाही. याला अधिकारीच जबाबदार राहणार आहेत,असे गोटे यांनी सांगितले.

कृषी महाविद्यालयातून रस्ता जाणार असल्याने या जागेचा मोबदला देखील अव्वाच्याच्या सव्वा मागितला जातो आहे .या जागेची शासकीय किंमत एक कोटी 90 लाख असताना सात कोटीची मागणी केली जाते आहे. कृषी महाविद्यालयाचे अधिकाऱ्यांसह महानगरपालिका बांधकाम विभागातील अधिकारी हे एका विशिष्ट राजकीय इशाराने रस्त्याचे काम रखडवत आहेत. मात्र जनतेच्या फायद्यासाठी असणारा हा रस्ता अशा निष्क्रिय राजकीय खेळीमुळे अडचणीत येणार असेल तर आपण जनतेसाठी देहत्याग आंदोलन करण्यास तयार आहोत. त्यामुळे धुळ्याच्या बांधकाम विभागासमोर 14 जून पासून आपण हे आंदोलन छेडणार आहोत. या आंदोलनात पाणी वगळता आपण कुठलेही अन्न घेणार नाही. यातून काही कमी जास्त झाल्यास त्याची जबाबदारी कृषी विभागाचे कुलपती, कुलसचिव, महानगरपालिका आयुक्त आणि बांधकाम विभागाचे अभियंते जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT