धुळे

धुळे : भर उन्हात महानगरपालिकेकडून लाखो लिटर पाण्याची नासाडी, शिवसेना महानगरप्रमुखांकडून निषेध

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा
सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भेडसावत असताना धुळे शहरात मात्र जलकुंभा जवळील व्हाॅलमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे शिवसेनेने घटनास्थळी या चेंबरमध्ये उतरून अंघोळ करीत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला. या संदर्भात मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून तक्रार करण्यात आली असून त्यांनी संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दिली आहे.

धुळे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होतो आहे. शहरात पाणीपुरवठ्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. परंतु नियोजन अभावी पाण्याचा साठा असून देखील अनेक जलकुंभ दररोज भरले जात नाहीत, तर काही ठिकाणी पाणी पुरवठा योजनेतून अनेक जलकुंभ हे तुडुंब भरून वाहत आहेत.

शहरातील जुने धुळे, आझादनगर व चाळीसगाव रोड येथील मायक्रोवेव्ह जल कुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या वरखेडी रोड येथील मधु बापू माळी जलकुंभ येथे मेन लाईन वरील वॉल्व हा नादुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. या पाण्यामुळे महामार्गालगतचा सर्विस रोड तसेच आजूबाजूचे शेत पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, कैलास मराठे, अनिल शिरसाठ यांनी या जलकुंभावर धाव घेत सत्य परिस्थिती जाणून घेतली. यावेळी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली. संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. एकीकडे धुळेकर नागरिक भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करीत असताना मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी झाली आहे. मनपा प्रशासन पाणीपुरवठा नियोजना संदर्भात बेजबाबदारपणे वागत असून त्याचा निषेध करत शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी या वाॅल्वच्या चेंबरमध्ये उतरून आंघोळ करीत मनपा प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.

धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाईपलाईन लिकेजेस होणे तसेच वॉल्व नादुरुस्त झाल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करताना हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या संदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार निवेदन देऊन देखील मनपा प्रशासन जागे होत नाही. धुळेकरांना दहा दिवसांऐवजी दोन-तीन दिवसानंतर पाणीपुरवठा व्हायला हवा, अशी आग्रही मागणी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले आहे . मनपा पाणीपुरवठा विभागाने भोंगळ कारभार त्वरित न थांबविल्यास ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT