धुळे : दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पडण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी आज शहरातील जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी हायस्कुल येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पडण्याचे निर्देश दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनीही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन परिक्षा कालावधीत सर्व संबंधितांनी परिक्षा केंद्रांना भेटी देण्याच्या सुचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज बारावी परिक्षेच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी जिल्हाधिकारी श्री. पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनी शहरातील परिक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन केंद्र प्रमुखांशी चर्चा करुन त्यांचेकडून तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली तसेच त्यांना आवश्यक त्या सुचना दिल्यात. यावेळी त्यांच्या समवेत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनीष पवार हेही उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षा केंद्रावरील बैठे पथकाने आवश्यक खबरादारी घ्यावी. ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार आढळून येतील तेथे कॉपी करणारा विद्यार्थी, त्याचे पालक, पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कुणीही येणार नाही, परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकाने परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाहीत. याची काळजी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घ्यावी, परीक्षा केंद्रावर कुणाचा हस्तक्षेप आढळल्यास त्वरीत नियंत्रण कक्षास माहिती देण्याच्या सुचनाही तेथील कर्मचाऱ्यांना दिल्या.