धुळे : शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या सुमारे १.८४ कोटी रुपयांच्या बेहिशोबी रोकड प्रकरणात मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अंतर्गत किशोर पाटील आणि दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, शासन आणि पोलीस प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असून, पोलिसांनी तपासाची केवळ नाटके केली आहेत, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
२१ मे रोजी, विधिमंडळ अंदाज समितीच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे कथित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी विविध विभागांकडून रक्कम गोळा केल्याचा आरोप गोटे यांनी केला होता. यानंतर त्यांनी शिवसैनिकांसह संशयित खोलीबाहेर आंदोलन केले. सहा तासांनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि खोलीचे कुलूप तोडून रोकड जप्त करण्यात आली.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, या गुन्ह्यांत फक्त तीन महिन्यांची शिक्षा अथवा ५०० रुपये दंड अशी तरतूद असल्याने, गोटे यांनी हे प्रकरण "दडपण्यासाठी दाखल केलेला तकलादू गुन्हा" असल्याचा आरोप केला.
गोटे म्हणाले, “आम्हीच ही माहिती उघड केली असूनही तक्रारदार म्हणून आमचा जबाब घेतला नाही. पोलिसांनी फक्त चौकशीचे ढोंग केले. खोलीत रोकड असल्याची माहिती देऊनही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सहा तास घटनास्थळी आले नाहीत. यावर शासनाने काय कारवाई केली, हे स्पष्ट करावे.”
गोटे यांनी मागणी केली की, भारतीय दंड संहितेच्या कलम ११८, १४०, २३८, २४०, २२७, २२८, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, आयटी ॲक्ट आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांकडून पुरावा नष्ट करण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा संदर्भ देत सांगितले की, एका पत्राच्या आधारावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता, त्यावर ईडीने १५० हून अधिक धाडी टाकल्या. मग धुळ्यात प्रत्यक्षात सापडलेली रोकड असताना ती प्रकरण दडपली जात आहे, हे दुर्दैवी आहे. गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देत विचारले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली एसआयटी आज कुठे आहे? या प्रकरणात ती का निष्क्रिय आहे?” अशी विचारणा त्यांनी केली आहे.