Dhule Guest House Accounted Cash Case Arjun Khotkar PA
धुळे : येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या बेहिशोबी रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाचे शुक्रवारी (दि. 27) पोलिसांना दिले. यामुळे विधानसभा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा पाय अधिक खोलात गेल्याचे बाेलले जात आहे.
धुळे येथील शासकीय विश्रामगृह येथे 21 मे रोजी बेहिशोबी एक कोटी 84 लाख रुपयांची रोकड आढळून आली होती. विधानसभा अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना आणि समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायकाच्या नावाने बुक असलेल्या खोलीत ही रक्कम सापडल्याने माजी आमदार अनिल गोटे यांनी सदर रक्कम अंदाज समितीला देण्यासाठी जमा करण्यात आल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. तसेच याबाबत तक्रार देऊनही पोलिस व संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी धुळे पोलिसांनी आठवड्याभरानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीत धुळ्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी के. बी. चौगुले यांनी या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे समितीचे अध्यक्ष खोतकर यांच्यासह समिती सदस्य तसेच या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
माजी आमदार गोटे यांनी या प्रकरणात पोलिसांकडून संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला असून, सदर बाबीचा पुरावा पुढे आल्यानंतर संबंधितांना सहआरोपी करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे मागणी करणार असल्याची माहिती दिली आहे.
न्यायालयाने शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याबराेबरच यापूर्वी चौकशी करणाऱ्या यंत्रणेने शहर ठाण्याला सर्व कागदपत्रे पोहोच करण्याचेदेखील आदेशात नमूद केले आहे. या आदेशामुळे आता भारतीय न्यायसंहितेचे कलम 174 ,173, 210 ब व 175 या कलमांन्वये गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती माजी आ. गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.