धुळे : गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाकडून खाजगी पंटरच्या माध्यमातून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन तलाठ्यांसह खाजगी इसमाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. धुळे तहसील कार्यालयातील तलाठी दिनेश दिलवर दाभाडे, बाळापूरच्या तलाठी मृणाल शरद नगराळे आणि खाजगी पंटर जयेश कैलास चौधरी अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदाराचा बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचे हायवा वाहन धुळ्यातील साक्री रोडवर थांबले होते. तेथे तलाठी दाभाडे आणि नगराळे यांनी चालकाकडून मालकाचा क्रमांक घेतला आणि त्यांना चाळीसगाव चौफुलीवर बोलावले. 'तुझ्या हायवाने वाहतूक करायची असेल तर २० हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा गुन्हा दाखल करू,' अशी धमकी दिली. घाबरलेल्या तक्रारदाराने त्याचवेळी ८ हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित १२ हजार रुपयांसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली.
लाचलुचपतने तक्रारीची पडताळणी केली असता, तलाठी दाभाडे यांनी लाचेची रक्कम खाजगी इसम जयेश चौधरी याच्याकडे देण्यास सांगितले. लाचलुचपतच्या पथकाने चाळीसगाव चौफुली परिसरात सापळा रचला. खाजगी पंटर जयेश चौधरी याने तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारून तलाठी नगराळे यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. त्यानंतर ही रक्कम तलाठी दाभाडे यांच्याकडे सुपूर्द करताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल व त्यांच्या पथकाने केली.