धुळे ; शिरपूर तालुक्यातील हाडाखेड नजीक प्लायवुडने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये प्लायवूड सह ट्रक जळून खाक झाला.सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. या आगीचे अद्याप कारण समोर आलेले नसले तरीही शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर प्लायवूड घेऊन शिरपूर कडे जाणाऱ्या ट्रकला हाडाखेड नजीकच्या गुरुद्वारासमोर भीषण आग लागली. चालकाला ट्रक मधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून तातडीने गाडी बाहेर उडी मारली. यानंतर काही क्षणातच ट्रक मधून आगीचे लोट बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ही माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडी मधील प्लायवूड पूर्णपणे जळून खाक झाले होते. त्याचप्रमाणे ट्रकचा देखील केवळ लोखंडी सांगाडा उरला होता. या आगीमुळे मुंबई आग्रा महामार्गावरील रहदारी काही काळ ठप्प झाली होती . मात्र ही रहदारी नंतर सुरळीत करण्यात आली. दरम्यान या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आगीचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.