आदिवासी पश्चिम भागात होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे. 
धुळे

धुळे : आदिवासी पश्चिम भागात होळी उत्सवाला सुरुवात

Holi 2025 | पाच दिवस आधीच गावा-गावात होळीचा सण होतो साजरा

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे आजही एक गाव एक होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. या होळीच्या उत्सवाला साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरुवात झाली असून होळीला पुढे पाच ते सात दिवस बाकी असतानाच आदिवासी ग्रामीण भागातील गावा-गावात सुरूवात होते. यामध्ये गावातील तरुण अविवाहीत मुले एकत्रित येऊन सायकांळी खोंड्या पेटवून आनंदीत होऊन याची चाहूल गावकऱ्यांना देतात. तर अविवाहित मुली सायंकाळी होळी गीत (लोल) गातात.

"होळी माय तू भोळी ग सदा शिमगा खेळी ग"!

ढोरक्या पोऱ्याची खोंड्या तोडी लया...री हाऊशी दिल्लीम लोल...लोल.!!

हे होळीची गाणे आनंदाने, खुशीने सायंकाळी गावातील प्रत्येक घराच्या अंगणात जाऊन पाच दिवस म्हणतात. पाचव्या दिवशी प्रत्येकाच्या घरातून हरभरा, वाटाणा, गहू असे धान्य/कडधान्य दिले जाते. या धान्याचा डाळ्या म्हणून होळीला नैवद्य दाखवितात,अशी ही प्रथा परंपरा सुरू आहे.

फाग (पैसे ) मागण्याची प्रथा

रस्त्यावर दोन्ही बाजूला दोर हातात धरून पूजेचा टिळा लावून नारळ देऊन या पाच दिवसात ज्या-त्या गावात रस्त्यावरून ये- जा करणाऱ्यांची पूजा केली जाते. मोटरसायकल व इतर वाहनधारकांना अडवून त्यांची पूजा केली जाते. त्यांनतर त्यांच्याकडून फाग म्हणून पैसे मागितले जातात. ही एक जुनी परंपरा आजही सुरू आहे. येथील आजही आदिवासी गावांमध्ये एक गाव एक होळी ही प्रथा सुरू आहे.

होळी साजरी करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र बसून एक दिवस अगोदर होळी घ्यायला जाण्यासाठी ठरवतात. कोणत्याही कामास न येणारे सावर या झाडाचं लाकूड जंगलातून होळीसाठी आणले जाते. ते ५४ लाकडाची होळीसाठी निवड केली जाते व ती होळी म्हणून पुजा करून पेटवून साजरी केली जाते. कामाचं लाकूड होळीसाठी तोडले जात नाही. सायंकाळी नवे कपडे घालून, सजून, धजून एकत्र येऊन होळीच्या मुख्य ठिकाणी जमतात. सर्व जमा झाले अशी खात्री झाली की,(जागल्या) गावाचा म्हणजे गावकऱ्यांचा कामदार याला होळीची पुजा झाल्यावर होळी पेटवण्याचा मान दिला जातो. होळी पेटवली की, सगळे आनंदाने आपले गोड अन्नपदार्थ बोना (नैवद्य) दाखवतात. गावातील कोणालाही त्या वर्षात मुलगा किंवा मुलगी झालेली असेल तर मुलगासाठी नारळ व मुलगीसाठी खोबऱ्याची वाटी नारळ म्हणून वाहिली जाते, अशी ही परंपरा आहे. होळी पेटून खाली पडेपर्यंत कोणीही खाली बसत नाही, खाली बसणाऱ्याकडून दंड घेतला जातो, अशीही परंपरा चालत आली आहे.

दोन दगड दोन्ही बाजूला ठेवून त्याचा भाला केला जातो. व दोन सागाच्या लाकडाची लहान छोट्या काठ्या गाडून त्याला आंब्याच्या पानांपासून तोरण बांधले जाते. त्या तोरणाखालून सगळे नारळ वाटी होळीची व्हायली जाते. होळी पडली की, पाखरी झेलून घेतली जाते मग त्याला पाच फेरा मारून नदीला ही पाखरी पाण्यात भिजवून आल्यावर होळीचा कपाळी टिळा लावून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. भेठी गाठी घेऊन, मग उशिरा जेवण केले जाते. होळी पडल्यानंतर पाच दिवस पुढे याचा उत्साह चालतो. पाचव्या दिवशी पेटवलेल्या होळीची राख आणून ती आपापल्या संपूर्ण घराला कोठी-कनगीला पाण्यात कालवून लावतात.

पाचव्या दिवशी पुन्हा एकदा गावातील सगळे गावकरी आनंदाने एकत्र येऊन होळी विझवण्यासाठी गावातील पाच पोरीना (मुलींना) मान देतात.नवीन पाणी आणून ती विझवतात.या पाच ते सात दिसांपासून चाललेल्या होळी उत्सवाची सांगता मोठ्या आनंदाने पार पडते, अशी ही संपूर्ण परंपरा हनुमंतपाडा गावातील सर्व आदिवासी बांधव आजही उत्साहात साजरे करतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT