धुळे : शहरातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातील अर्थात टॉवर गार्डनमधील दगडी स्तंभावरील घड्याळाचे ठोके पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पहाटे ५ ते रात्री १० दरम्यान दर तासानुसार गार्डनपासून ५०० मीटरपर्यंत हे संगीतमय गजर ऐकायला येणार आहेत, अशी माहिती शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.
शहरातील ऐतिहासिक सरदार वल्लभभाई पटेल उद्यान अर्थात टॉवर गार्डनची अतिशय दुरवस्था झाली होती. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष असताना आमदार अनुप अग्रवाल यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करत तब्बल पाच कोटींहून अधिक निधी मिळविला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकच्या माध्यमातून या निधीतून आता सरदार वल्लभभाई पटेल उद्यानाच्या सुशोभीकरणासह विविध कामे पूर्ण झाली आहेत. याच उद्यानातील ब्रिटिशकालीन दगडी स्तंभावर एक घड्याळ असून ते अनेक वर्षांपासून बंद होते. त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार टॉवर गार्डनमधील दगडी स्तंभावरील बंद अवस्थेतील घड्याळाची टिकटिक पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यानुसार सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातील ब्रिटिशकालीन दगडी स्तंभावरील जुन्या घड्याळाचे बॅकग्राउंड डायल व रंग बदलून जीपीएस टेक्नॉलॉजीसह इलेक्ट्रॉनिक स्ट्रायकिंग सिस्टिमचे आहुजा कंपनीचे अद्ययावत घड्याळ बसविण्यात येणार आहे. या उंच स्तंभावरील घड्याळातील वेळ अगदी रस्त्यावरून स्पष्ट दिसून येणार असून, पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत या घड्याळाचे तासानुसार गजर टॉवर गार्डनपासून सुमारे ५०० मीटरपर्यंत ऐकू येतील, अशी यंत्रणा त्यात कार्यान्वित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी व आवश्यक तेव्हा हे गजर सुरू-बंद करण्याची व्यवस्थाही या घड्याळात असणार आहे. येत्या २६ मार्चला असलेल्या श्रीराम नवमीपूर्वी हे घड्याळ कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आमदार अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, धुळे शहरातील ऐतिहासिक अशा सरदार वल्लभभाई पटेल उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर या उद्यानातील दगडी स्तंभावरील अनेक वर्षांपासून बंद असलेले घड्याळही सुरू करण्यात येत आहे. त्यात दर तासानुसार संगीतमय गजर वाजणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत संबंधित तंत्रज्ञाकडून याबाबतची आवश्यक ती कार्यवाही पूर्णत्वास येईल. तशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे टॉवर गार्डनमधील घड्याळाची टिकटिक पुन्हा एकदा सुरू होणार आहे.