धुळे : "नवप्रविष्ठ पोलीस हे समाजाचे खरे पहारेकरी असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांशी वागणूक न्यायपूर्ण, निर्भय आणि सहकार्याची असावी. कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता जबाबदारीने आणि निष्ठेने कार्य करावे," असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंगळवार (दि.9) रोजी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना केले. पोलीस प्रशिक्षण केंद्रात सत्र क्र. १२ मधील ६४५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ कवायत मैदानावर पार पडला. यावेळी कराळे बोलत होते.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपप्राचार्य राहुल फुला आदी मान्यवर उपस्थित होते.
कराळे म्हणाले की, “आजचा दिवस तुमच्या पोलीस जीवनातील एक गौरवशाली टप्पा आहे. प्रशिक्षण संपले असले तरी तुमचा खरा प्रवास आता सुरू होतो. वर्दी ही केवळ पोशाख नाही, तर ती निष्ठा, जबाबदारी आणि समाजाप्रतीच्या बलिदानाचे प्रतीक आहे.”
विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांच्या हस्ते या सत्रातील यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रशस्तीपत्र प्राप्त विजेते असे...
बेस्ट टर्न आऊट: ऋषिकेश मठकर (सिंधुदुर्ग)
आंतरवर्ग प्रथम: सूर्यभान पाटील (जळगाव)
बाह्यवर्ग प्रथम: दिग्विजय दाभाडे (जळगाव)
गोळीबार प्रथम: शरद कोंड (नाशिक ग्रामीण)
कमांडो प्रथम: दिग्विजय दाभाडे (जळगाव)
बेस्ट ड्रिल (पद व शस्त्र): जितेंद्र मोरे (मीरा-भाईंदर)
सर्वोत्कृष्ट खेळाडू: अमर क्षीरसागर (सोलापूर ग्रामीण)
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी: सूर्यभान पाटील (जळगाव)
त्यांनी प्रशिक्षणार्थींना सतर्क, चौकस आणि समाजाशी सतत संवाद ठेवणारे अधिकारी होण्याचे आवाहन केले. “पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रभावशाली नागरीक, व्यापारी, सामाजिक संस्थांशी संबंध ठेवावेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती वेळेवर मिळू शकते आणि संभाव्य तणावाचे प्रसंगही टाळता येतात,” असेही त्यांनी सांगितले.
“गेल्या १०–१२ वर्षांत सोशल मिडिया आणि प्रसारमाध्यमांमुळे समाजामध्ये प्रचंड जागरूकता आली आहे. कोणत्याही घटनेचे पडसाद कुठे आणि कसे उमटतील सांगता येत नाही. त्यामुळे पोलीस म्हणून सदैव जागरूक आणि तयार राहण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य विजय पवार यांनी सांगितले की, आतापर्यंत १२ सत्रांतून ४,३८५ पोलीस प्रशिक्षणार्थींना आणि ३ सत्रांतून १,०३५ होमगार्डना मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय विविध कोर्सेस अंतर्गत १०,१५८ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले आहे.