Temperature Pudhari
धुळे

Dhule Temperature | धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठला; नागरिक घामाघूम

मागील तीन दिवसांपासून 38 अंशांच्या आसपास असलेले तापमान अचानक वाढून 42 अंशांवर

पुढारी वृत्तसेवा

Dhule heat wave news

धुळे : जिल्ह्यात तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत असून थंड पेये व पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही भागांत तापमान वाढण्याचा इशारा दिला होता, त्याचा परिणाम धुळे जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवत आहे. मागील तीन दिवसांपासून 38 अंशांच्या आसपास असलेले तापमान अचानक वाढून 42 अंशांवर पोहोचले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते, तर दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत उकाड्याचा कडाका अधिक वाढतो. शनिवारी 38 अंशांवर असलेले तापमान रविवारी 40 अंशांपर्यंत गेले, त्यानंतर 41 अंशांवर स्थिरावलेले तापमान आता 42 अंशांवर पोहोचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत असून दुपारच्या वेळी शहरातील रस्ते सुनसान दिसत आहेत. दरम्यान, बाजारात थंड पेये तसेच रसाळ फळांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. गरज असल्यास बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरावा, भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो सकाळच्या थंड वेळेतच शेती किंवा इतर कामे पूर्ण करावीत, असेही सांगितले आहे. उष्णतेमुळे मळमळ, अशक्तपणा किंवा इतर त्रास जाणवल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT