संशोधक विद्यार्थी घनश्याम धर्मराज हिरे 
धुळे

Dhule Success Story | सलून दुकानात काम करत मिळवली पीएच.डी. : साक्रीचा सलून दुकानदाराचा मुलगा होणार 'एनआयटी'मध्ये शास्त्रज्ञ

आनंदाची बातमी कळाली तेव्हा घनश्याम कात्री घेऊन करत होता दुकानात केशकर्तन

पुढारी वृत्तसेवा

अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा:परिस्थिती हलाखीची असली की अनेक जण नशिबाला दोष देत बसतात.मात्र साक्री तालुक्यातील छडवेल पखरुन येथील तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर गरिबीचे अडथळे दूर करत यशाला गवसणी घातली.वडिलांसोबत सलून दुकानात काम करणाऱ्या घनश्याम धर्मराज हिरे याने थेट 'एनआयटी' वारंगल (तेलंगणा) येथे पीएच.डी. संशोधनासाठी प्रवेश निश्चित करून तालुक्याचा नावलौकिक देशपातळीवर नेला.

घनश्यामचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले. शहरातील गोल्डी हॉटेल शेजारी त्याचे वडील धर्मराज हिरे यांचे छोटेसे सलून दुकान आहे. घराचा गाडा हाकताना वडिलांची ओढाताण होऊ नये म्हणून घनश्यामने कधीही कामाची लाज बाळगली नाही.सकाळी सातपासून तो वडिलांसोबत दुकानात काम करायचा.सकाळी अकराला हातातील सी. गो.पाटील विज्ञान महाविद्यालयात शिक्षणासाठी जायचा. वह्या,पुस्तके आणि परीक्षेची फी तो स्वतःच्या कष्टाच्या पैशातून भरत असे.

गाठले थेट वारंगल

घनश्यामची बुद्धिमत्ता बी.एससी.केमिस्ट्री विषयात चमकली,जिथे त्याने 'ए प्लस' ग्रेडसह प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर त्याची निवड मुंबईतील डॉ.होमी भाभा युनिव्हर्सिटीमध्ये एम.एससी. साठी झाली. मुंबईत असतानाही सुटीच्या काळात त्याने सलूनचे काम सुरूच ठेवले. नुकतीच त्याने एनआयटी वारंगलची संशोधनासाठीची प्रवेश परीक्षा आणि मुलाखत यशस्वीपणे पूर्ण केली. आता तो सेंद्रिय रसायनशास्त्र विभागात 'पॉलिमर' विषयावर संशोधन करणार आहे.

घनश्यामच्या निवडीची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. अनेक जण त्याचे अभिनंदन करण्यासाठी दुकानात पोहचले, तेव्हा घनश्याम हातात कात्री घेऊन काम करत असल्याचे पाहून अनेकांचे डोळे पाणावले. आपल्या पारंपरिक व्यवसायाशी असलेली ही निष्ठा आणि नम्रता पाहून त्याचे कौतुक होत आहे. भविष्यात परदेशातून 'पोस्ट डॉक्टरेट' मिळवून शास्त्रज्ञ होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

कोणतेही काम लहान नसते.वडिलांना कामात मदत करत शिक्षण पूर्ण केल्याचा मला अभिमान आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तर ग्रामीण भागातील मुलेही अशक्य यश मिळवू शकतात.
घनश्याम हिरे,संशोधक विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT