पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटनेच्या निषेधार्थ आज (दि.५) साक्री तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजातर्फे शहरात मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात हजारो मराठा समाजबांधव व भगिनी सहभागी झाले होते.हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान,साक्रीसह तालुक्यातील निजामपूर, दहिवेल, पिंपळनेर, कासारे येथे बंद पाळण्यात आला. (Dhule Maratha Andolan)
शहरातील छत्रपती शिवाजी वाचनालयापासून आज सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरवात झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर घोषणाबाजीसह मोर्चाला सुरवात झाली. येथून हा मोर्चा बसस्थानक मार्गे वंजारी गल्ली, संतोषी माता चौक, सोनार गल्ली, मेन बाजार, नगरपंचायतमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. (Dhule Maratha Andolan)
या मोर्चादम्यान जोरदार घोषणाजी करण्यात येत होती. एक मराठा,लाख मराठा… आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे… मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे…जालना घटनेतील दोषींवर कारवाई झालीच पाहीजे…यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चेकऱ्यांनी 'मी मराठा' असे लिहलेली गांधी टोपी परिधान केलेली होती.शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या मोर्चाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
सकल मराठा समाजातर्फे आज साक्री बंदची हाक देण्यात आली होती. बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. बससेवा व शाळा वगळता इतर सर्व व्यवसाय व व्यापार बंद ठेवण्यात आले होते.
यावेळी साक्री तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात मराठा समाज गेल्या 40 वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे.अनेकदा शांततेच्या मार्गाने आंदोलने झाली,मोर्चे काढले गेले, शमात्र,अद्यापही आरक्षणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही. मध्यंतरीच्या काळात आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तो कायदेशीर बाबींवर टिकला नाही. यावेळी साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा