सोनगीर : धुळे तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या सोनगीर आणि आसपासच्या परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. परिसरातील जलस्त्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
सोनगीर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची तसेच इतर स्त्रोतांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. दरवर्षी या भागात पाणीटंचाई जाणवते, मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना आता १२ ते १४ दिवस पाणी येत नसल्याने गृहिणींचे हाल होत आहेत.
पाण्यासाठी खासगी टँकरचा आधार :
शासकीय पाणीपुरवठा योजना थंडावल्याने ग्रामस्थांना नाईलाजास्तव खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. एका टँकरसाठी ८०० ते १००० रुपये मोजावे लागत असल्याने गरीब कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. ज्यांच्याकडे स्वतःची साधने आहेत, ते बैलगाडी किंवा दुचाकीवरून शेतातील विहिरींवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे.
सुलवाडे-जामफळ योजनेकडे डोळे :
सोनगीर सह परिसरातील ११ गावे व तालुक्यातील ५४ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करून पाणी या भागांत सोडल्यास, पाण्याचा प्रश्न सुटेल. ही योजना कार्यान्वित झाल्यास परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पशुधनाचा प्रश्न गंभीर :
केवळ मानवासाठीच नाही, तर पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. परिसरातील नाले आणि ओढे कोरडे पडल्याने वन्यजीवही पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. ग्रामस्थ त्रस्त असताना देखील मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या सुस्ती कारभारामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अगोदरच यावर उपाय योजना आखल्या असत्या तर ग्रामस्थांना या गंभीर प्रश्नापासून धीर मिळाला असता. सोनगीर ग्रामपंचायतवर ग्रामस्थ टीका करत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. पिण्याचे पाणी १४ दिवस कसे साठवून ठेवावे अशी चर्चा सुरु झाली आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर परिस्थितीत लवकरात लवकर उपाय योजना करून पाणीपुरवठा नियमित करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.