धुळे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या सोनगीर गावातील बसस्थानकाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या गावात न थांबता बायपासवरून निघून जातात. यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
Dhule songir bus stand News
सोनगीर : गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागणीसाठी सोनगीर येथील व्यंगचित्रकार निखिलसिंग परदेशी यांनी रेखाटलेले व्यंगचित्र सध्या खूप प्रसिद्ध झाले आहे. ते व्यंगचित्र सोशल मीडियाच्या माध्यमाने बसस्थानक नसल्याने किती समस्या उद्भवतात, हे जाणीव करुन देत गावातील ग्रामस्थांना जागृत केलं आहे.
आता सर्व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या प्रश्नावर संघटित लढा उभारण्यासाठी विठ्ठल मंदिरात व्यापक बैठक घेतली आणि 'सोनगीर मध्यवर्ती बसस्थानक कृती समिती'ची स्थापना करण्यात आली. निमंत्रकपदी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
तीन दशकांपासूनची प्रतीक्षा आणि गैरसोय मुंबई-आग्रा महामार्गावर वसलेल्या सोनगीरची लोकसंख्या सुमारे ३५ हजार आहे. शिरपूर, धुळे आणि दोंडाईचा या दिशांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी गावात तीन स्वतंत्र थांबे आहेत. मात्र, हक्काचे बसस्थानक नसल्याने वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना ऊन-वारा-पावसात उघड्यावर उभे राहावे लागते. २५ हून अधिक गावांसाठी मुख्य बाजारपेठ आणि बाभळे-नरडाणा एम.आय.डी.सी.च्या वाढत्या विस्तारामुळे येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते.
बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीने पोलिस ठाण्यासमोरील खडकावर चार एकर जागा आरक्षित ठेवली आहे. मात्र, सरकारकडून तातडीने निर्णय न झाल्यास कोट्यवधी रुपयांची ही मौल्यवान जागा भूमाफियांच्या किंवा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडण्याची भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली
समितीने दिला आंदोलनाचा इशारा
या बैठकीला प्रशासक सरपंच लखन ठेलारी, एल.बी.चौधरी, हसन पठान, निखिलसिंग परदेशी, भूषण कासार श्यामकांत गुजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. "आगामी काळात शासन दरबारी ही मागणी प्रभावीपणे मांडली जाईल आणि गरज पडल्यास सर्वंकष आंदोलन पुकारले जाईल," असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.
तांब्या-पितळाच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या बाजारपेठेला हक्काचे बसस्थानक मिळणे ही काळाची गरज असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.