Songir Rural Hospital Pudhari
धुळे

Dhule News | सोनगीर ग्रामीण रुग्णालय कर्मचारी बदली प्रकरण; चार सदस्यीय चौकशी समिती गठित

जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून तक्रारीची दखल

पुढारी वृत्तसेवा

Dhule Songir Rural Hospital Staff Transfer Case

धुळे : सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमानुसार बदली करावी, तसेच रुग्णालयातील कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हा रुग्णालय, धुळे प्रशासनाने चौकशी समिती गठित केली आहे.

सोनगीर येथील दिनेश सुरेश देवरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. ग्रामीण रुग्णालयात काही कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे ग्रामस्थांकडून निदर्शनास आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सोनगीरच्या ५ जून २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेतही स्वच्छता कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांची नियमानुसार बदली करण्याबाबत ठराव झाल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे.

तक्रारीत ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदस्थापना व सेवाकालाची माहिती तपासावी, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करावी आणि बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची शासन नियम व बदली धोरणानुसार बदली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत ठेवण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी अथवा आदेश आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

चार सदस्यीय समितीची नियुक्ती

या प्रकरणी जिल्हा रुग्णालय, धुळे प्रशासनाने आदेश काढून चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे.

समितीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविंद्र प्रकाश सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कौतिक जाधव, प्रशासकीय अधिकारी राकेश अशोक भावसार आणि कार्यालय अधीक्षक खंडू दांगल ईशी यांचा समावेश आहे.

समितीने तक्रारीतील नमूद मुद्द्यांची सखोल चौकशी करून अहवाल तात्काळ सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता चौकशी समितीच्या निवडणुकीत अहवालाकडे सोनगीरकरांचे लक्ष लागले असून, चौकशीनंतर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT