धुळे

Dhule News : कर्तव्य बजावताना धुळ्याचे सुपुत्र जयेश माळी यांना वीरमरण, रामी गावावर शोककळा!

मणिपूरमधील इम्फाळ पूर्व येथे गस्ती पथकाच्या वाहनाला अपघात, मूळ गावी रामी येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पुढारी वृत्तसेवा

धुळे : देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र भारतीय सैन्यदलाचे नर्सिंग असिस्टंट शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले. मणिपूर राज्यातील इम्फाळ पूर्व परिसरात 18 नोव्हेंबर रोजी गस्ती मोहिमेदरम्यान सैन्यदलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी रामी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवृत्त मेजर डॉ. निलेश पाटील यांनी दिली आहे.

शिपाई जयेश माळी हे भारतीय सैन्यदलाच्या 357 फील्ड हॉस्पिटल युनिटमध्ये नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत होते. मणिपूरमधील इम्फाळ पूर्व येथील चालौ परिसरात गस्त घालण्यासाठी गेलेल्या सैन्य पथकात त्यांचा समावेश होता. या मोहिमेदरम्यान ते लाईट स्पेशालिस्ट व्हेईकल या वाहनातून प्रवास करत असताना वाहनाला अपघात झाला. वाहन घसरून जवळच्या तलावात गेल्याने ते पाण्यात बुडाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि सैन्यदलाच्या क्विक रिॲक्शन टीमने तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांतून शिपाई जयेश माळी यांना पाण्याबाहेर काढून बाबिना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय पथकाने त्यांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पाण्यात बुडाल्यामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

शहीद जवान जयेश माळी हे धुळे तालुक्यातील रामी येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात वडील हिम्मत धर्मा महाजन आणि आई साधनाबाई असा परिवार आहे. ते अविवाहित होते. देशसेवेत असताना त्यांच्या झालेल्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रामी येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

शहीद नर्सिंग असिस्टंट शिपाई जयेश माळी यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी रामी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराची तारीख व वेळ अद्याप निश्चित झालेली नसून, ती निश्चित होताच याबाबत माहिती देण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवृत्त मेजर डॉ. निलेश पाटील यांनी कळविले आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या या सुपुत्राच्या निधनाने धुळे जिल्ह्याने एक कर्तव्यनिष्ठ जवान गमावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT